मंडणगड : पंचायत समिती मंडणगड अंतर्गत ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती येथे राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेत अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेत ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस पंचायत समितीचे उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्या दीप्ती घडशी, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, ग्रामपंचायत अधिकारी तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक सेविका व कर्मचारी उपस्थित होते. अभियानांतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांचा तसेच मिडटर्म असेसमेंटचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचविणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे आणि विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर कार्यशाळेत चर्चा झाली. अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांना पुढील टप्प्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गाव शंभर टक्के आरोग्यसंपन्न करण्यासाठी गावनिहाय विशेष उपक्रम व कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले ‘निरोगी कुटुंब, समृद्ध गाव’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नागरिकांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे