मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ज्या समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत, ते अत्यंत प्रेरणादायी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी टिकाकारांना उत्तर दिले आहे.
दरम्यान सुनेत्रा पवार यांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि ठामपणा पाहून माझ्यासारख्या अनेक महिलांना नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळतो असेही वैशाली नागवडे यांनी स्पष्ट केले आहे.महिला नेतृत्वाला संधी देण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याची मानसिकताही दाखवली पाहिजे असा टोला वैशाली नागवडे यांनी लगावला आहे.
एकीकडे त्यांना ताकद देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांच्याच क्षमतेवर अविश्वास व्यक्त करायचा, हा नेमका कोणता राजकीय विरोधाभास? असा सवालही वैशाली नागवडे यांनी उपस्थित केला आहे.पुण्याच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी सूचना जरूर करा, सरकारला जाबही विचारा; पण महिला नेतृत्वाचा सन्मान राखून.. ! हेही आवर्जून वैशाली नागवडे यांनी सांगितले आहे.
महिलांना संधी मिळाली की त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असतं आणि त्यांना सहकार्य करायचं असतं ,त्यांच्या अधिकारांवर दुसऱ्याचा हक्क सांगायचा नसतो. राजकारण जरूर करा, पण महिला नेतृत्वाच्या मुद्द्यावर तरी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवा.. ! असा खोचक टोलाही वैशाली नागवडे यांनी लगावला आहे.
महिला सक्षमीकरणाच्या आणि पुरोगामी विचारांच्या गप्पा मारणारे आपल्या महाराष्ट्रातील काही नेते आजही घरातलं महिला नेतृत्व मनापासून स्वीकारण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचलेले नाही मग सामान्य महिलांचे काय? असा सवाल करतानाच महिला सक्षमीकरण हे केवळ भाषणात नव्हे, तर कृतीतून पण दिसायला हवं . राजकारण करा , पण राजकीय दुटपीपणा नको.. ! हे सगळं पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो असेही वैशाली नागवडे यांनी म्हटले आहे.