चिपळूण: नवकोकण एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा क्रमांक १, दातेवाडी, खेर्डी येथे करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या निवासी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव आणि लोकसेवेची भावना रुजविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत . ‘ नशामुक्त व क्षयरोगमुक्त युवा घडविण्याचा संकल्प’ हा शिबिराचा विशेष विषय असून युवकांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देणे आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शिबिरादरम्यान जलसाक्षरता, पर्यावरण जागृती, लेख वाचवा जनजागरण, आपत्ती व्यवस्थापन, निसर्ग संवर्धन तसेच अंधश्रद्धा निर्मूलन यांसारखे विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारे आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे हे शिबिर ठरणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर यांनी दिली .