मुंबई : भारतीय संविधान हे केवळ पानांचे पुस्तक नसून भारतीय जनतेचे सुरक्षा कवच आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केवळ स्वतःसाठी किंवा एका समाजासाठी केली नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी केली आहे. त्यामुळे संविधानाचा केवळ जयघोष करण्यापेक्षा त्यातील मूल्यांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन लालसिंग आर्य यांनी केले.
संविधान गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने के. सी. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. प्रवीण दरेकर महापौर रितू तावडे, आ. योगेश सागर, आ. मनीषा चौधरी, आ. चित्रा वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. आर्य म्हणाले की, आज देशात संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण या विषयांवर अनेक प्रकारचे विचारमंथन सुरू आहे. मात्र, या विषयांच्या माध्यमातून समाजात संघर्ष निर्माण करण्याचेही प्रयत्न होत आहेत. संविधानात नसलेल्या गोष्टींच्या आधारे समाजातील विविध घटकांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे प्रयत्न होत आहेत.
भारतीय संविधान हे केवळ पानांचे पुस्तक आहे की भारतीय जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारे सुरक्षा कवच आहे, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती कोणत्याही एका समाजासाठी केली नसून हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता आणि सन्मान मिळावा, या व्यापक उद्देशाने केली आहे. त्यामुळे संविधानाला जागतिक स्तरावरही महत्त्वाचे स्थान आहे, असे ते म्हणाले.
संविधान हातात घेऊन ते केवळ मिरवणे आणि संविधानातील मूल्यांचे प्रत्यक्ष पालन करणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संविधानाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याऐवजी त्यातील तत्त्वे जीवनात रुजवली पाहिजेत. संविधान हा राजकारणाचा विषय नसून प्रत्येक भारतीयाच्या आस्था, विश्वास आणि राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. संविधान हा भारताचा आत्मा, सन्मान, स्वाभिमान आणि अभिमान असल्याचे आर्य यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सुरक्षा कवच दिले आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, संधीची समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार ही संविधानाची प्रमुख मूल्ये आहेत. या मूल्यांच्या आधारेच देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाचा अवमान करणाऱ्या घटना इतिहासात अनेकदा घडल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडूनही संविधानाच्या मूळ भावनेचे पालन झाले नाही, अशी टीका करताना आर्य यांनी संविधानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांवर निशाणा साधला. काही लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा वापर स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन म्हणून केला; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला देशाच्या लोककल्याणाचे माध्यम बनवले आहे, असा दावा करत संविधान गौरव दिन साजरा करताना संविधानाची निर्मिती करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा उद्देश आणि त्यातील मूल्यांचे पालन करणाऱ्यांची भूमिका या सर्व बाबींवर चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले, आज देशभरात असंख्य राजकीय पक्ष निर्माण झाले आहेत. या प्रत्येक राजकीय पक्षाला संविधानाबद्दल आणि संविधानातील सर्व तरतुदींबद्दल किती माहिती आहे, याचा कुठेतरी येणाऱ्या काळात विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भाजपाची विचारधारा ही संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या वेगळ्या पद्धतीच्या विचारांची आहे. संविधानात अंतर्भूत असलेल्या सर्व बाबींचे तंतोतंत पालन कसे करता येईल, यासाठी झटणारी विचारधारा कोणती असेल तर ती एकमेव विचारधारा आहे आणि ती तुमची, आमची सर्वांची भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, असे यांनी विषद केले.
आपल्याला देशाला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जायचे आहे. अराजकतेपासून देशाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचे आहे. काही मंडळी ज्या पद्धतीने अराजकता माजवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो आणि आपल्याला नेमके काय करता येऊ शकते, हे आपल्या सर्वांना सिद्ध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे श्री. रविंद्र चव्हाण यांनी नमूद केले.
1949 साली देशात संविधान सादर केल्यानंतर तब्बल 66 वर्षांनी या देशात हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा व्हावा हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवला. त्यामुळे 2015 पासून सलग बारा वर्षे आपण हा दिवस साजरा करतोय. हा दिवस साजरा करण्यासाठी 66 वर्षे लागली यातच सर्व काही आले. अख्या भारतभूमीचा आत्मा आणि दहा हजर वर्षांचा इतिहास हा डॉ. बाबासाहेबांनी संविधानात अंतर्भूत केला आहे, असे प्रतिपादन आ. अमित साटम यांनी केले.
संविधान केवळ पानांचे पुस्तक नाही, तर भारतीय जनतेचे सुरक्षा कवच…
