रत्नागिरी – खरीप हंगाम २०२६ साठी राबविण्यात येत असलेल्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता तातडीने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केले आहे.
बदलते हवामान, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कीड-रोगांचा प्रादुर्भाव तसेच विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकाला आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे अंतिम दिवसाची वाट न पाहता तातडीने अर्ज करून आपल्या पिकाचे विमा संरक्षण निश्चित करावे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमधील भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू असून ३१ जुलै २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र, AGRISTACK शेतकरी ओळख क्रमांक तसेच ई-पीक पाहणीची नोंद. अर्ज या ठिकाणी करावा :-अधिकृत बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ [www.pmfby.gov .in](http://www.pmfby.gov.i n) वर ऑनलाइन अर्ज करता येईल. योजनेविषयी अधिक माहिती, मार्गदर्शन अथवा शंका असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले तसेच संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी केवळ माहितीअभावी किंवा विलंबामुळे या योजनेपासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केले आहे…