चिपळूण : हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अखेर खरा ठरला असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणसह कोकणात आज सायंकाळपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे वातावरणात गारवा जाणवला. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरण सुखद झाले असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनाही या पावसाचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना गती मिळू शकते, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.
