चिपळूण : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांच्या पुढाकाराने निवळी (ता. चिपळूण) येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हरितक्रांतीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शेतकऱ्यांचा सन्मान, आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयामार्फत शेतीविषयक जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात कृषीदूतांनी शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित करत, “शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध” हा प्रेरणादायी संदेश दिला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला.

हा उपक्रम कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले तसेच सर्व विषयतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषीदूत मयुरी गावडे, सानिका भोसले व वैष्णवी कोकरे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी कृषीदूत शीतल डोहळे हिने उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.