चिपळूण : शहरातील प्रलंबित कामे, प्रशासनाची ढिलाई आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणने आक्रमक भूमिका घेत थेट नगरपरिषदेत धडक दिली. शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेत निवेदनांच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला.
बहादुरशेख नाका टेलिफोन एक्सचेंज ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळा दरम्यानचा मंजूर रस्ता मुद्दाम अर्धवट ठेवण्यात आल्याचा आरोप करत या रस्त्यामुळे नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
