मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकूण 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी यासाठी दबाव वाढत असताना, शिंदे गटाकडून दहावा उमेदवार उभा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी याबाबत संकेत देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांनी सांगितले की, “आमचे दोन उमेदवार निश्चितच संख्याबळाच्या जोरावर निवडून येतील. उरलेली मते आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. परिस्थिती पाहून दहावा उमेदवार देण्याचा निर्णय होऊ शकतो.” त्यांनी स्पष्ट केले की हा उमेदवार कोणाच्या विरोधात विशेषतः उभा राहणार नसून संख्याबळावर आधारित असेल.निरुपम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शरद पवारांशी तुलना केली. “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भावना असू शकते. मात्र उद्धव ठाकरे इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी,” असे ते म्हणाले.