चिपळूण : येथील व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकप्रेरणा गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता खेंड येथील माऊली लॉन्स सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सह-दुय्यम निबंधक वर्ग-२ स्मिता गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी रमाकांत पवार हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात महादेव दत्ताराम चव्हाण यांना ‘लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्कार’, भास्कर रामचंद्र कदम यांना ‘लोकप्रेरणा ज्ञानरत्न पुरस्कार’, प्रमोद शंकर ठसाळे यांना ‘लोकप्रेरणा प्रशासकीय रत्न पुरस्कार’, प्रकाश अनंत गांधी यांना ‘लोकप्रेरणा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’, विलास दत्ताराम महाडिक यांना ‘लोकप्रेरणा कोकण गौरव पुरस्कार’, मकरंद माधव भागवत यांना ‘लोकप्रेरणा निर्भीड लेखणी गौरव पुरस्कार’, नयनिश रमेश गुढेकर यांना ‘लोकप्रेरणा पक्षीमित्र गौरव पुरस्कार’, सतीश रजनीकांत जाधव यांना ‘लोकप्रेरणा मनोदीप ज्ञानगौरव पुरस्कार’, रंजिता विजय ओतारी यांना ‘लोकप्रेरणा नारीशक्ती गौरव पुरस्कार’ तसेच अनिकेत सुधीर जाधव यांना ‘लोकप्रेरणा युवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.