मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही फक्त उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेशी केलेली गद्दारी नाही तर काँग्रेस महाविकास आघाडीशी सुद्धा त्यांनी गद्दारी केलेली आहे. जनतेने यांना महायुतीच्या विरोधात मतदान करून विजयी केले, त्यांचा हा विश्वासघात आहे, अशा गद्दारांना यापुढे जनताच धडा शिकवेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाली की, शिवसेना (UBT ) पक्षातून जे सहा खासदार बंडखोरी करून बाहेर पडले ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या सहा जणांसाठीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला, त्यांच्यासाठी कोणत्याही धमक्यांची पर्वा केली नाही, कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत व जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला, ही बंडखोरी या सर्वांचा अपमान आहे, या सर्वांशी या सहा खासदारांनी गद्दारी केलेली आहे. पैशासाठी लाचार झालेले हे लोक जनतेची सेवा करूच शकत नाहीत, त्यांना फक्त पैसा हवा आहे. पैशाने विकले जाणारे हे लोक कोणाचेही नसतात, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवत, हम करे सो कायदा, या पद्धतीचा तुघलकी कारभार सुरु केला आहे. सत्ता, सत्ता आणि सत्ता हेच त्यांचे ध्येय असून मागील काही वर्षात निवडणुका म्हणजे ‘पैसा फेक, तमाशा देख’चा खेळ सुरु आहे. निवडणुकीत विजय मिळाला नाही तर विजयी उमेदवारांना पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे, नाहीतर निवडणुक आयोगाला हाताशी धरून उमेदवारीच रद्द करायची, असा अत्यंत विकृत कारभार सुरु झाला आहे. हे सर्व प्रकार लोकशाहीस घातक आहेत पण सर्वात दुर्दैवी म्हणजे या सर्व घटनांना विधिमंडळ, संसद व न्यायालय, कुठेही न्याय मिळत नाही ही शोकंतिका आहे. सर्व संस्थांवर भाजपाने कब्जा केला असून दहशतीच्या जोरावर राज्यकारभर सुरु आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
