पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
११ मार्च रोजी ‘X’ (माजी ट्विटर) वर केलेल्या आपल्या वक्तव्यात त्यांनी इशारा दिला होता की, अमेरिका-इराण संघर्ष दीर्घकाळ चालल्यास आणि अशा मोठ्या संकटासाठी भारताची अपुरी तयारी यामुळे CNG वर अवलंबून असलेल्या उद्योगांवर गंभीर परिणाम होईल. त्यांनी म्हटले की, महिनाभरापूर्वी केलेला इशारा आज प्रत्यक्षात उतरलेला दिसत आहे.
आंबेडकर यांनी पुढे आरोप केला की, ‘आत्मनिर्भर’च्या घोषणा करूनही देशांतर्गत गॅस साठवणूक व पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक गुंतवणूक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
सध्या निर्माण झालेल्या LPG तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून, घरगुती स्वयंपाक करणेही कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना लाकूड, कोळसा किंवा केरोसीनसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर करावा लागत आहे. सिलेंडरच्या काळ्या बाजारातील दर वाढल्याने आर्थिक ताणही वाढला आहे.
याशिवाय, इंधनावर अवलंबून असलेले छोटे हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक उद्योग यांनाही मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी व्यवसाय बंद पडल्याने रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “मोदी स्वतः अमेरिकेसमोर झुकले आहेत, पण भारतातील मध्यमवर्ग आणि गरीबांना का त्रास देत आहेत? नरेंद्र, सिलेंडर कधी मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, देशातील वाढत्या गॅस टंचाईच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
