रत्नागिरी:- यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेल्या कोकणच्या आंबा आणि काजू बागायतदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली असून, या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा कृषी विभाग आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आला आहे.
नुकसानीची व्याप्ती मोठी असल्याने महसूल आणि कृषी विभागाची संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यासह स्थानिक स्तरावर सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. ही पथके गावोगावी जाऊन बागायतदारांची माहिती गोळा करत आहेत, जेणेकरून एकही गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.