दापोली(प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसेवेचे अखंड व्रत जपणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थातच सर्वसामान्यांच्या “लालपरी”च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दापोली आगारात वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि राज्याच्या हरित भविष्यासाठी आपली बांधिलकी अधोरेखित करत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
राज्याचे परिवहन मंत्री नाम. प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्वच एस. टी. आगारातून या वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. दापोली आगारामध्ये झालेला हा कार्यक्रम किशोर देसाई, प्रभाकर गोलांबडे, सौ. साधनाताई महाजन, सौ. मीनाक्षी शेडगे या जि. परिषद सदस्यांच्या आणि दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र संघटक प्रदिप सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. दीप्तीताई निखार्गे, उपतालुका प्रमुख संजय महाडीक, उप शहर प्रमुख मंदार केळकर, नगरसेवक विलास शिगवण, सौ. प्रीती शिर्के यांच्यासह दापोली आगाराचे अधिकारी, पालक व्यवस्थापक ठोंबरे, प्रभारी व्यवस्थापक सौ. प्रभुणे, मुनाफ राजापकर, नाफाडे, यांच्यासह एस. टी. कर्मचारी, प्रवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातत्याने प्रवासी सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाने केवळ वाहतूक व्यवस्थेपुरतीच आपली भूमिका मर्यादित न ठेवता सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीही तेवढ्याच प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला. आगार परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
“एक वृक्ष म्हणजे भविष्यातील शाश्वत जीवनाची हमी” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे दापोली आगार परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत होणार आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाचा हा उपक्रम विशेष महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांनी व्यक्त केले. तर दापोलीतील प्रवास्यांना अधिकाधिक सुलभ सेवा पुरवण्याचा प्रयत्न आगार व्यवस्थापनाकडून सातत्याने होत असल्याबाबत नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग यांनी समाधान व्यक्त केले. नाम. योगेशदादा कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदयजी सामंत यांच्या माध्यमातून दापोली आगाराला बसेस, काँक्रिटिकरण आणि नवीन आद्ययावत आगार उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सौ. घाग यांनी आपल्या मनोगतावेळी सांगितले.
गेली ७८ वर्षे ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणून कार्यरत असलेली लालपरी आजही लाखो प्रवाशांचा विश्वास टिकवून आहे. जनसेवेबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत एस.टी. महामंडळाने आपल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून समाजापुढे एक आदर्श निर्माण केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविणारी लालपरी आता हरित महाराष्ट्राच्या दिशेनेही वाटचाल करत असल्याचे चित्र दापोली आगारातील या उपक्रमातून पाहायला मिळाले.
राज्याच्या हरित भविष्यासाठी एस.टी. महामंडळाचे एक पाऊल पुढे!
