चिपळूण : चिपळूण शहर व तालुक्यात महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट (प्रीपेड) मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज महावितरण कार्यालय, पॉवर हाऊस येथे हजारो नागरिकांच्या सहभागाने धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे सुमारे १० हजार नागरिकांनी नाव, ग्राहक क्रमांक, मीटर क्रमांक व स्वाक्षरीसह दिलेले स्मार्ट मीटरविरोधातील हरकत अर्ज महावितरणकडे सुपूर्द करण्यात आले.
शिवसेना चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता भामरे, उपकार्यकारी अभियंता डोंगरे तसेच राऊत यांच्यासमवेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर योजनेबाबत अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करत, पोस्टपेड व्यवस्था का बदलली जात आहे, ग्राहकांवर सक्ती का केली जात आहे, योजनेचा आर्थिक व तांत्रिक परिणाम काय आहे, तसेच नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलण्याचा अधिकार महावितरणला कोणत्या तरतुदीखाली आहे, यासह विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना जाब विचारला.
चर्चेदरम्यान पदाधिकाऱ्यांनी चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींना नागरिकांसमोर उपस्थित करून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली. तसेच महावितरणने या योजनेबाबत स्पष्ट व लेखी भूमिका मांडावी, अशीही मागणी करण्यात आली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत, स्मार्ट मीटरविरोधात यापूर्वी दोन वेळा निवेदने देऊनही महावितरणने जनभावनांची दखल घेतली नसल्याचा आरोप केला. लोकांच्या स्पष्ट विरोधानंतरही चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, आतापर्यंत सुमारे १० हजार वीज ग्राहकांनी नाव, ग्राहक क्रमांक, मीटर क्रमांक व स्वाक्षरीसह हरकत अर्ज शिवसेनेकडे जमा केले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविता येत नसताना, घरी कोणी नसताना किंवा महिलांची दिशाभूल करून मीटर बदलले जात असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे सांगत त्याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. अनेक भागांत स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलात अनपेक्षित वाढ झाल्याच्या तक्रारी, बिल दुरुस्तीची पूर्वीची यंत्रणा निष्प्रभ झाल्याने ग्राहकांना न्याय मिळत नसल्याची वस्तुस्थिती तसेच महावितरण जनतेसाठी काम करत आहे की केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी, असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला.
