चिपळूण : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांत तपास पूर्ण करून सोमवारी (दि. १३ एप्रिल) चिपळूण येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले. या प्रकरणात च पतसंस्थेच्या १० कर्मचाऱ्यांना संशयित आरोपी करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी तीव्र भूमिका घेत निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ४०० लागू करून पुढील कार्यवाही सुरू केल्याने पत्रकारांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
चार्जशीट दाखल झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी तपास अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेत तपासाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. अल्पावधीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

आता हे प्रकरण पुढील न्यायप्रक्रियेसाठी न्यायालयात गेल्याने सर्वांचे लक्ष सुनावणीकडे लागले असून, आरोपींना योग्य शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.