चिपळूण : तालुक्यातील येलोंडवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थलांतर नोटीस बजावल्यानंतर प्रकल्पग्रस्त नागरिक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत आणि संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली असंख्य ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदन सादर केले.
येलोंडवाडी प्रकल्पामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील तसेच क्षेत्राबाहेरील देवदेवकी, शिरवली परिसरातील अनेक कुटुंबे बाधित झाली आहेत. प्रकल्पासाठी जमीन संपादन होऊन बराच कालावधी लोटला असला, तरी आजतागायत पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पाणी, वीज, रस्ता, अंतर्गत गटारे, शाळा, आरोग्य सुविधा अशा मूलभूत सोयी उपलब्ध करून न देता स्थलांतराचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्याकडून वस्तुस्थितीची पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, त्यानंतरही प्रश्न प्रलंबितच राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रकल्प विकासासाठी असला तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होता कामा नये. आम्ही स्थलांतरास तयार आहोत; मात्र त्याआधी पुनर्वसन स्थळी सर्व मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम भूमिका जि. प. सदस्या शिवानी सावंत यांनी मांडली. प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या १ मे पासून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. या आंदोलनामुळे येलोंडवाडी प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.