लोटे : पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि हवामानात वेगाने होत असलेले बदल लक्षात घेता वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लोटे औद्योगिक वसाहतीतील कृष्णा अँटीऑक्सिडंट्स कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत डोंगराळ भागातील पडीक जमिनीवर तब्बल १,५०० विविध वृक्षांची लागवड केली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने औद्योगिक वसाहतीतील डोंगराळ भागातील पडीक जमीन २५ वर्षांच्या भाडेकराराने घेतली असून, या उजाड परिसराचे हरित क्षेत्रात रूपांतर करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत स्थानिक देशी वृक्षांसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आली असून, भविष्यात या परिसरातील जैवविविधतेला याचा मोठा फायदा होणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणखी १०० झाडांची लागवड करण्यात आली.

डोंगरउतारावरील वृक्षांचे संगोपन हे मोठे आव्हान असते. मात्र, कंपनीने केवळ वृक्षलागवडीपुरते न थांबता त्यांच्या संवर्धनासाठीही प्रभावी नियोजन केले आहे. संपूर्ण परिसरात ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली असून, सर्व झाडांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे. तसेच, पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे.

वृक्षलागवड कार्यक्रमानंतर कंपनीच्या वतीने लोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कंपनीचे जनरल मॅनेजर एस. एम. पाटील, अधिकारी रोहित महाडेश्वर, शुभम कदम, रोहन शिंदे, किरण घाग तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ राजेश आंब्रे, सुनील आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.