​चिपळूण : तालुक्यातील टेरव गावात बिबट्याचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत असून बिबट्याचे गावात वारंवार दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
​टेरव येथील कुंभारवाडी परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गावातील विष्णू सागवेकर यांच्या कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात आधीच भीतीचे वातावरण असताना, आता पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. सध्या कुंभारवाडी येथील ग्रामस्थ ​शिवराम करंडेकर यांच्या घराजवळ बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि शेतात जाणारे शेतकरी यांना याचा धोका अधिक जाणवत आहे. गावकऱ्यांनी या प्रकाराची माहिती वनविभागाला दिली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.