खेड : खेड तालुक्यातील लोटे परिसरातील लायन्स क्लब ऑफ लोटेचा शपथग्रहण सोहळा शुक्रवारी (दि. २६) अतिशय उत्साहात पार पडला. परशुराम येथील हॉटेल आम्रबनच्या गंधर्व सभागृहात नूतन कार्यकारिणीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
नवीन कार्यकारिणीमध्ये उद्योजक राजेश तिवारी यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर सचिवपदी विजय पोटे आणि खजिनदारपदी जगजीवन देवरुखकर यांची निवड करण्यात आली. माजी प्रांतपाल एम.जे.एफ. लायन जगदीश पुरोहित यांनी नूतन कार्यकारिणीला शपथ दिली. याच सोहळ्यादरम्यान जागतिक पातळीवरील योगासन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या लोटेच्या कन्या तन्वी रेडीज हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल एम.जे.एफ. लायन जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन निलेश पाटील, झोन चेअरमन निलेश हेडुकर, रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, लोटे-परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, सर्व लायन सदस्य तसेच परिसरातील उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
