खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील सापिर्ली-भराडवाडी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना दि. २० मे २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. भरत कृष्णाजी पालांडे असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सापिर्ली येथील जखमी फिर्यादी भरत कृष्णाजी पालांडे (वय ६५) यांच्या शेजारी राहणारे आरोपी सतीश श्रीकांत पालांडे यांच्या मालकीचा आंबे काढण्याचा झेला भरत पालांडे यांनी आरोपींना न विचारता त्यांच्या वडिलांना विचारून आणला होता. याचा राग मनात धरून आरोपी सतीश पालांडे यांनी फिर्यादी भरत पालांडे यांना बांबूच्या काठीने पाठीवर मारहाण केली. तसेच हाताने गळा दाबून व नखाने चेहऱ्यावर ओरबाडून शिवीगाळ केली. याशिवाय त्यांच्या आईलाही धक्काबुक्की केली. या मारहाणीत भरत पालांडे जखमी झाले.
याबाबतची फिर्याद भरत कृष्णाजी पालांडे (वय ६५) यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार, संशयित आरोपी सतीश श्रीकांत पालांडे याच्याविरोधात दि. २१ मे २०२६ रोजी दुपारी ३:१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.