चिपळूण : धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, शिवारात हिरवीगार पिके डोलावीत आणि शेतकऱ्यांच्या कष्टांना उत्पन्नाची जोड मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नातूवाडी धरण प्रकल्पाचे कालवा निरीक्षक महंमद हनीफ बाबासो मुजावर हे ३१ ऑक्टोबरला शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी पाणीवाटपाचे नियोजन करताना शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेतीन वाजता नातूवाडी धरण प्रकल्पस्थळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
मुजावर यांनी १९९१ मध्ये कालवा निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथेही त्यांनी काही काळ सेवा बजावली. नातूवाडी धरण प्रकल्पावर अवलंबून असलेल्या १६ गावांतील शेतकऱ्यांशी नियमित संपर्क ठेवून त्यांच्या मागणीनुसार पाणीवाटपाचे नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी प्रभावी उपयोग व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
उन्हाळी भातशेती, कडधान्यांची लागवड आणि भाजीपाला उत्पादनासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. पाण्याचा योग्य वापर करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाणीवाटपावर देखरेख ठेवण्याबरोबरच पाणीपट्टी वेळेवर वसूल व्हावी आणि शासनाचा महसूल वाढावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
कर्तव्यनिष्ठेबरोबरच हसतमुख आणि मनमिळाव स्वभाव ही मुजावर यांची ओळख राहिली. सहकाऱ्यांच्या आणि परिचितांच्या अडीअडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी माणुसकीची नाती जपली. शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना शेतकरी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
मुजावर हे बांधकाम खाते सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित, रत्नागिरी या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता अनिल सा. बुधारम राहणार आहेत. कनिष्ठ अभियंते बळवंत पवार व हेमंत ढवण, वरिष्ठ लिपिक प्रीतम नलावडे, कनिष्ठ लिपिक अनिकेत मोहिते, पतपेढीचे अध्यक्ष शरद शेलार तसेच संचालक विष्णू देसाई, दिलीप मोहिते, दत्ताराम गोरे, नितीन सपकाळ आणि सागर कोलगे उपस्थित राहणार आहेत.