लांजा : (गोविंद चव्हाण) प्लास्टिक बंदीसंदर्भातील शासनाच्या नियमांचे कडक पालन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने लांजा नगरपंचायतीचा कारवाईचा धडाका सुरूच असून, सोमवारी शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत १२० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, दोन मोठ्या विक्रेत्यांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी पथकाकडून लांजा शहरात मागील आठ दिवसांपासून कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवार, १५ जून रोजी प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लांजा शहरातील दोन मोठ्या प्लास्टिक विक्रेत्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जप्त करून संबंधितांना भविष्यात नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
नगरपंचायतीच्या या दंडात्मक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने नगरपंचायत प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांना सहकार्य करावे, असे आवाहनही नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.
मोहीम सुरू केल्यापासून सोमवार, १५ जूनपर्यंत झालेल्या कारवाईत एकूण १८८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोमवारी राबविण्यात आलेल्या कारवाई मोहिमेत नगरपंचायतीच्या कर प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, स्वच्छता निरीक्षक सूरज जाधव तसेच नगरपंचायतीचे इतर कर्मचारी सहभागी झाले होते. एकीकडे नगरपंचायतीच्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, दुसरीकडे मात्र सोमवारी झालेल्या धडक दंडात्मक कारवाईमुळे लांजा शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांची धावपळ उडाली आहे.