चिपळूण : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे यांना भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा भाजपच्या चिटणीस पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी समीर टाकळे यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
चिपळूणात शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले समीर टाकळे यांनी महिनाभरापूर्वी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला होता.चिपळूण शहरात गेली अनेक वर्षे ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होते.अखंड शिवसेनेचे उप शहरप्रमुख म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले,तसेच नगरपालिका निवडणूक देखील त्यांनी लढवली होती.नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ.सानिका हिने देखील निवडणूक लढवली होती.उबाठामध्ये सुरू असलेले राजकारण कार्यकर्त्यांसाठी घातक आहे,असा थेट आरोप करत त्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
समीर टाकळे यांची काम करण्याची पद्धत,त्यांचे संघटन कौशल्य आणि सर्वसामान्य लोकांशी त्यांचा असणारा थेट संपर्क याची दखल घेत प्रशांत यादव यांनी त्यांना भाजपमध्ये घेतले आणि काम करा,पक्ष तुम्हाला न्याय देईल,काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये संधी मिळते,असा शब्द दिला होता.दरम्यान प्रशांत यादव यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे साहजिकच समीर टाकळे सारख्या दमदार कार्यकर्त्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
दोनच दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपली नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर केली त्यामध्ये समीर टाकळे यांना थेट जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती देत त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव हे एक प्रगल्भ व सर्वसमावेशक तसेच कार्यकर्त्यांची जाण असलेले नेतृत्व आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक जोमाने व प्रामाणिकपणे करून जिल्ह्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊ,२०२९ मध्ये चिपळूणचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल हे मुख्य उद्देश समोर ठेवून काम करणार असल्याचे जिल्हा चिटणीस समीर टाकळे यांनी म्हटले आहे.