लांजा (गोविंद चव्हाण) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ७८ वा वर्धापन दिन सोमवारी, १ जून रोजी लांजा एसटी बस आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
लांजा तालुक्यात एकूण १२३ गावे असून ४७ बसेस उपलब्ध आहेत. या बसेसना एकूण १,३३० फेऱ्या माराव्या लागतात. आगारात ३० ते ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या ३१ जुन्या व १० नवीन अशा एकूण ४१ गाड्या सेवेत आहेत. तरीही गाड्या व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे. त्यामुळे १२३ गावांमध्ये केवळ ४१ गाड्यांवर वाहतूक व्यवस्था चालवावी लागत आहे.
आगारप्रमुख काव्या पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून या विशेष दिवसाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तसेच त्यांचा सन्मानही करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त लांजा एसटी बस आगार आणि बसस्थानक परिसर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. तसेच एका बसची विधिवत पूजा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या केक कापण्याच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडला.
