शिरगाव : चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील महेश राजाराम यादव यांचा मृतदेह शिरगाव येथील शिगवण महाराज मठामागील शेतात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश यादव यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते अनेकदा विविध ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आढळत असत. तसेच, काही वेळा ते घरीही परतत नसत. गेल्या चार दिवसांपासून ते घरातून बेपत्ता होते.
बुधवार, ३ जून रोजी शिरगाव येथील शिगवण महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतात एका व्यक्तीला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. याची माहिती तत्काळ शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती महेश राजाराम यादव असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.