सिंधुदुर्ग : जन्माष्टमीच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील चित्रकार श्रुती सुतार यांनी आपल्या अनोख्या कलेतून श्रीकृष्णाला कलात्मक मानवंदना दिली आहे. अवघ्या ७ सेंटीमीटर उंच आणि २ सेंटीमीटर रुंद बासरीवर त्यांनी श्रीकृष्णाचे सूक्ष्म आणि मनमोहक चित्र साकारले आहे.
वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथील चित्रकार श्रुती संतोष सुतार यांनी अॅक्रेलिक रंगांच्या माध्यमातून ही कलाकृती साकारली असून, सध्या ती कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
श्रीकृष्ण आणि बासरीचे अतूट नाते लक्षात घेऊन त्याच बासरीवर श्रीकृष्णाचे चित्र साकारण्याची कल्पना सुचल्याचे श्रुती सुतार यांनी सांगितले. जन्माष्टमीच्या निमित्ताने ही कलाकृती म्हणजे श्रीकृष्णाला वाहिलेली छोटीशी कलात्मक भेट असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
श्रुती सुतार यांनी यापूर्वीही रुईचे पान, गंधगोळी, तुळशीचे पान, मोरपिस, टिकली आणि विणेसारख्या विविध लहान आणि नैसर्गिक माध्यमांवर वैशिष्ट्यपूर्ण चित्रे साकारली आहेत.
भक्ती, कल्पकता आणि सूक्ष्म चित्रकलेचा अनोखा संगम असलेली ही श्रीकृष्णाची कलाकृती जन्माष्टमीच्या उत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे.
