सावर्डे : मुंबई विद्यापीठाच्या झोन IV(रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग)ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डेची खेळाडू कु.मीनल राम जोगळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत दुहेरी पदकांची कमाई केली. तिने महिला डिस्कस थ्रो प्रकारात २१.३४ मीटर अंतर नोंदवत सुवर्णपदक, तर महिला हॅमर थ्रो प्रकारात २०.४५ मीटर अंतर नोंदवत कांस्यपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची आंतरविभागीय (Interzonal) स्पर्धा २०२६ साठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत मीनलने आपल्या कौशल्याची, मेहनतीची आणि जिद्दीची प्रभावी छाप पाडली. दोन वेगवेगळ्या मैदानी क्रीडा प्रकारांत पदके मिळवून तिने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

मीनलच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार मा. शेखर निकम, कार्यकारी अध्यक्ष मा. अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, इतर पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा विभाग तसेच विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले. आगामी आंतरविभागीय स्पर्धेतही ती अशीच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डेच्या या गुणवंत खेळाडूचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.