चिपळूण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने 12 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने जादा गाड्या सोडण्यात आल्यानंतर आता दिवाळीच्या सुट्यांमध्येही प्रवाशांसह पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
यामध्ये ट्रेन क्रमांक 06013/06014 तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन-तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडीचा समावेश आहे. ट्रेन क्रमांक 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन विशेष गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून दर बुधवारी 21 व 28 ऑक्टोबर, तसेच 4, 11, 18 व 25 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.45 वाजता सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.
परतीची ट्रेन क्रमांक 06014 मदार जंक्शन-तिरुवनंतपुरम सेंट्रल विशेष गाडी मदार जंक्शन येथून दर शनिवारी 24 व 31 ऑक्टोबर तसेच 7, 14, 21 व 28 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9.40 वाजता सुटणार आहे. ही गाडी चौथ्या दिवशी मध्यरात्री 12.45 वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचणार आहे.
चिपळूणसह प्रमुख स्थानकांवर थांबे
या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव जंक्शन, थिवी, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पनवेल यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त कोकणात येणाऱ्या तसेच कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.
या गाडीला कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलीकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिसूर, शोरानूर जंक्शन, तिरूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू जंक्शन, सुरथकल रोड, उडुपी रोड, कुंदापुरा, मोकंबिका रोड बायंदूर, मुर्डेश्वर, कुमठा, कारवार, मडगाव जंक्शन, थिवी, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा जंक्शन, गोध्रा जंक्शन, मंडसोर, निमाच, चित्तौरगड, भिलवाडा, बिजाईनगर आणि अजमेर जंक्शन येथे थांबे असतील.
20 एलएचबी डबे
विशेष गाडीमध्ये एकूण 20 एलएचबी डबे असणार आहेत. यामध्ये एक द्विस्तरीय वातानुकूलित डबा, चार त्रिस्तरीय वातानुकूलित डबे, 13 त्रिस्तरीय वातानुकूलित अर्थव्यवस्था श्रेणीचे डब्यांचा समावेश आहे. विशेष गाडीचे थांबे व वेळापत्रकाची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दिवाळीत कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 12 विशेष गाड्या ; वाढती प्रवासी व पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय ; चिपळूणसह प्रमुख स्थानकांवर थांबे…
