चिपळूण : खेड-चिपळूण मार्गावरील फर्शी बसथांब्यावरून डी.बी.जे. महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना दररोज एसटी प्रवासादरम्यान विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळच्या महाविद्यालयीन वेळेत फर्शी स्टॉपवर मोठ्या संख्येने विद्यार्थी एसटीची प्रतीक्षा करत असतात. बस थांबत असली तरी अनेकदा सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसमध्ये चढू न देता चालक घाईघाईने बस पुढे घेऊन जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा तोल जाऊन पडण्याची वेळ आली असून, सुदैवाने आतापर्यंत मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, अशा प्रकारामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, अनेक वेळा फर्शी बसथांब्यावर न थांबता एसटी बस थेट उड्डाणपुलावरून पुढे जात असल्याचीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळे बसथांब्यावर प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील बसची वाट पाहावी लागते. परिणामी महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही, व्याख्याने चुकतात आणि उपस्थितीवरही परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तसेच, कधी समोर आलेल्या बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने किंवा त्यामध्ये चढता न आल्याने मागून येणाऱ्या खेड-चिपळूण एसी बसमध्ये विद्यार्थी बसतात. मात्र, त्यावेळी काही वाहकांकडून “तुम्ही आधीच्या बसमध्ये का बसला नाही?” अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात असल्याचीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. विद्यार्थ्यांचा उद्देश केवळ सुरक्षितपणे आणि वेळेत महाविद्यालयात पोहोचण्याचा असताना अशा प्रकारामुळे त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाविद्यालयीन वेळेत फर्शी बसथांब्यावर येणाऱ्या सर्व एसटी बसने नियमानुसार थांबावे, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, बसथांबा वगळून उड्डाणपुलावरून बस नेण्याचे प्रकार तातडीने बंद करावेत तसेच चालक-वाहकांनी विद्यार्थ्यांशी सौजन्यपूर्ण व जबाबदारीने वागावे, अशी माग
