महाड :- भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन सोहळा अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे भर पावसात उत्साहात पार पडला. राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.
पालकमंत्री पदाची प्रतीक्षा मंत्री भरत गोगावले यांना करावी लागली असली, तरी रायगडच्या मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण करण्याचा मान त्यांना मिळाला. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला. रायगड जिल्हा प्रशासनाकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा, पोलीस बांधव, विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या योगदानाचे कौतुक करत समाजासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेहा भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
रायगडच्या मुख्यालयी झालेल्या या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाची भावना पाहायला मिळाली.