खेड : – गणेशोत्सवानिमित्त कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खेड आणि जेसीआय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने २४ तास मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.
उपक्रमांतर्गत भरणे नाका, खेड रेल्वे स्टेशन आणि लवेल-दाभिळ नाका या तीन ठिकाणी आरोग्य तपासणी बूथ उभारण्यात आले आहेत. या बूथचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही सेवा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे. चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना या केंद्रांवर डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक तसेच ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार व प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवासादरम्यान किंवा गावी आल्यानंतर अचानक आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खेड आणि जेसीआय खेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी विजय करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, डॉ. अक्षय पवार, जेसीआयचे माजी अध्यक्ष अमित कदम, अध्यक्ष अमित नामुष्टे, जेसीआय सेक्रेटरी व कार्यक्रम प्रमुख शंकर पार्टे, जय पद्मिनी, आरोग्य निरीक्षक निलेश सकपाळ, दत्ताराम पड्याल, CHO शेळके, RBSK प्राची आखाडे, ANM, महसूल विभागाच्या दिपाली शिंदे, ॲम्बुलन्स चालक मिथुन यादव आदी उपस्थित होते.
“गणेशोत्सव आनंदात साजरा करा, आरोग्याची काळजी घ्या” या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
