चिपळूण : सण-उत्सवांच्या परंपरेसोबत सांस्कृतिक कार्य आणि सेवाभावाची दोन दशकांहून अधिक काळाची परंपरा जपणाऱ्या रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे यंदाही ‘घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रंजिता विजय ओतारी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा नववे वर्ष आहे.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा आणि भावनिक विषय आहे. याच पार्श्वभूमीवर घरगुती गणपती व गौरी सजावटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. उपक्रमाचे सातत्य, विश्वासार्हता, उत्कृष्ट नियोजन, आकर्षक बक्षिसे आणि महिलांसह चिपळूणकरांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या स्पर्धेला चांगली लोकप्रियता मिळाली आहे.

लौकिक अर्थाने ही स्पर्धा असली तरी, एकमेकांच्या घरी भेट देत संवादातून आनंद मिळवून देणारा हा उपक्रम असल्याचे रंजिता ओतारी यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या घरी गौरी किंवा गणपतीची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख करून पत्ता व व्हॉट्सॲप क्रमांक ९६२३११०८२० या क्रमांकावर पाठवावा. स्पर्धेचे परीक्षक थेट स्पर्धकांच्या घरी जाऊन सजावटीचे परीक्षण करणार आहेत.

चांदीची आकर्षक बक्षिसे

स्पर्धेतील विजेत्यांसाठी यंदाही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास चांदीची गणेशमूर्ती, द्वितीय क्रमांकास चांदीची लक्ष्मीमूर्ती आणि तृतीय क्रमांकास चांदीचे त्रिशूळ देण्यात येणार आहे. तसेच सहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना चांदीचे मोदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय सर्व सहभागी स्पर्धक, विजेते आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ सप्टेंबर २०२६पर्यंत नोंदणी करता येणार असून, स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. परंपरा जोपासत सणांचा आनंद घेणे हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे रंजिता ओतारी यांनी सांगितले.

नवव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्पर्धेत समस्त चिपळूणकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन रंजिता ओतारी यांनी केले आहे.