दापोली :- शिक्षकांना सक्षम करून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब दापोली यांच्या वतीने ‘शिक्षकांचे सक्षमीकरण – भविष्याची घडण’ या संकल्पनेवर आधारित *‘Empowering Educators – Shaping Futures’हा विशेष उपक्रम दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजणी येथे आयोजित करण्यात आला.
शिक्षकांच्या ज्ञानात व कौशल्यात वाढ करणे, शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांशी शिक्षकांना अवगत करून देणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष लायन गुरुप्रसाद बेर्डे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रमुख साधन असून शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा मुख्य आधार आहे. “सक्षम शिक्षक म्हणजे सक्षम पिढी आणि सक्षम शिक्षकांमधूनच सक्षम समाजाची निर्मिती होते,” असे सांगत शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी लायन्स क्लब दापोली सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहिती व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. शिक्षक सक्षम झाले तर त्याचा थेट सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीवर होतो, असेही लायन गुरुप्रसाद बेर्डे यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला लायन सुजय मेहता, लायन रितू मेहता, खजिनदार लायन फजल रखांगे, झोन चेअरमन लायन निलेश हेदुकर, डायरेक्टर लायन आशिष मेहता तसेच लायन मनोहर जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लायन्स क्लब दापोलीच्या माध्यमातून भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचे प्रशासन, शिक्षकवृंद आणि लायन्स क्लब दापोलीच्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.