दापोली :- दापोली तालुक्यातील गव्हे येथे ‘अमृते चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने कै. श्री. अरविंद अमृते यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य, नेत्र, दंत तपासणी व औषधे वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा परिसरातील एकूण १०८ शेतकरी आणि ग्रामस्थांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रसाद करमरकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुयोग भागवत लाभले होते. या प्रसंगी डॉ. मंदार क्षीरसागर व डॉ. पवन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
चांगला आहार आणि व्यायामाने आरोग्य जपा: डॉ. सुयोग भागवत
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. सुयोग भागवत यांनी शेतकरी व ग्रामस्थांना निरोगी आयुष्यासाठी चांगला आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय काळजी घेण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच सध्याच्या काळात प्लास्टिकच्या अतिवापराचे शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेता, दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवणार
अमृते चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शैला अमृते यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. आगामी काळातही गावात व परिसरात असेच लोककल्याणकारी उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान माजी उपसरपंच महेश मुंडेकर यांनी कै. श्री. अरविंद अमृते यांच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली.
मान्यवरांची उपस्थिती –
या शिबिराला अमृते चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सौ. गोमती अमृते, खजिनदार सौ. आशिका अमृते-चाचड, उपसरपंच बाळकृष्ण जोशी, गावचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, पोलिस पाटील संदीप लिंगावळे, माजी सरपंच अशोक गुरव आणि अरुण पालटे, माजी उपसरपंच महेश मुंडेकर, सुनंदन भावे, ब्राम्हणवाडी अध्यक्ष सदानंद आंबेकर, सचिन पवार, पत्रकार अजित सुर्वे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात लायन्स क्लब, दापोली च्या वतीने उपस्थित सर्व शेतकरी व ग्रामस्थांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार श्री. आशिष अमृते यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच श्री. बाळकृष्ण जोशी यांनी अत्यंत उत्तम रीतीने केले.
