चिपळूण: पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप महाविद्यालयात ‘निसर्गस्नेही जगूया सारे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणप्रेमी श्री. दिलीप कुलकर्णी व डॉ. पौर्णिमा कुलकर्णी उपस्थित होते त्यांचे स्वागत प्रा. धनश्री कासार यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज तसेच पर्यावरण संवर्धनातील प्रत्येकाच्या योगदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, पाण्याची टंचाई आणि हवामानातील बदल यांसारख्या समस्यांवर प्रकाश टाकत पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
निसर्गाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे बदल घडवून आणल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण निर्माण करता येईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘निसर्ग वाचवा, पर्यावरण जपा आणि निसर्गस्नेही जीवनशैली स्वीकारा’ असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. आरती गुहागरकर यांनी केले. यावेळी निसर्गप्रेमी श्री. विनायक वैद्य, ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य तसेच ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यलयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा, संस्थेचे सर्व सभासद, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांचेकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.