लोटे: एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय, घाणेखुंट-लोटे येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत ‘निसर्गस्नेही जगू या सारे’ या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनशैली या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५/११/२०२६ रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पर्यावरणप्रेमी लेखक व व्याख्याते श्री. दिलीप कुलकर्णी तसेच डॉ. पौर्णिमा कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून पर्यावरण जागृती व संवर्धनाच्या कार्यात सक्रिय असलेल्या या वक्त्यांनी स्वतःच्या दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब केला आहे. श्री. दिलीप कुलकर्णी यांनी पर्यावरण जागृती, शाश्वत जीवनशैली आणि उत्तम जीवनमूल्ये या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.
शाश्वत जीवनशैलीचा संदेश
मार्गदर्शनादरम्यान वक्त्यांनी पर्यावरण संवर्धन, निसर्गाशी सुसंवाद आणि संसाधनांचा कमीत कमी तसेच विवेकपूर्ण वापर यांचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. ऊर्जासंवर्धन, पर्यावरणपूरक सवयी आणि Reduce, Replace, Reuse व Recycle या 4R तत्त्वांचा दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
साधी, काटकसरीची आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली हीच शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली असल्याचा संदेश वक्त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पर्यावरण रक्षण ही केवळ सामूहिक जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने ती आपल्या दैनंदिन आचरणातून जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पुस्तक प्रदर्शन व संवाद
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या पर्यावरणविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजिण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे अवलोकन केले तसेच वक्त्यांशी अनौपचारिक संवाद साधून पर्यावरण संवर्धन आणि दैनंदिन जीवनातील पर्यावरणपूरक बदलांविषयी चर्चा केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची व्यावहारिक दृष्टी मिळाली. निसर्गाचे जतन करण्यासाठी दैनंदिन जीवनात सजग, जबाबदार आणि पर्यावरणपूरक वर्तन आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.
‘निसर्गस्नेही जगू या सारे’ उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न…
