खेड (प्रतिनिधी) : – मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात इंधन आणि सीएनजी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने काही पंप पूर्णपणे बंद ठेवावे लागले असून सुरू असलेल्या पंपांवरही मर्यादित प्रमाणात इंधन वितरण केले जात आहे.
यामुळे कोकणात पर्यटनासाठी आलेले पर्यटक तसेच स्थानिक वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावरही झाला असून सीएनजी पंपांवर प्रचंड गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा एक ते दोन किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
इंधन टंचाईमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासावर परिणाम होत असून वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीलाही फटका बसत आहे. दरम्यान, इंधन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.