चिपळूण (प्रतिनिधी) : विभा अरविंद ग्रंथालय आणि आपलं चिपळूण या समाजाभिमुख संस्थांच्या सहयोगाने मुंबईस्थित टच या सामाजिक संस्थेच्या यांच्या माध्यमातून मंगळवार, दि. २३ जून रोजी चिपळूण तालुक्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मुंढे तर्फे सावर्डे पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडरे क्र. २ तसेच श्रमिक सहयोग संचलित प्रयोगभूमी, कोळकेवाडी येथील विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य व अन्य आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
“शिक्षण हेच सामर्थ्य ही संकल्पना ग्रामीण तसेच कोळकेवाडीसारख्या अतिदुर्गम, आदिवासी व कातकरी भागांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाचा प्रवाह मागास भागांपर्यंत पोहोचावा आणि येथील विद्यार्थी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावेत, या उदात्त हेतूने संबंधित संस्था सातत्याने कार्यरत आहेत.
विभा अरविंद ग्रंथालय हे केवळ वाचनालय नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे प्रभावी केंद्र बनत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
या प्रसंगी टच संस्थेच्या वतीने दर्शिनी देसाई व जया कांबळी उपस्थित होत्या. तसेच ग्रंथालयाचे संचालक प्रा. विकास मेहंदळे, कार्यवाह विजय कदम, दत्त शिक्षण संस्थेचे चे अध्यक्ष श्री. तानाजीराव शिंदे, तसेच विभा अरविंद ग्रंथालयाचे कार्यकर्ते श्री सुमित सागवेकर, सौ.स्मिता मेंदरकर, श्री सिताराम पडते उपस्थित होते.या तिन्ही प्राथमिक शाळांमधील ६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुंडे तर्फे सावर्डे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी काजरोळकर, उपशिक्षक श्री. रमेश घडशी, श्री.सुनिल किजबिले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.प्राजक्ता मोरे, अंगणवाडी शिक्षिका सौ. प्रियंका मोरे उपस्थित होत्या.
तसेच अडरे शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक श्री .दादासाहेब चौगुले, समिती अध्यक्षा सौ.श्रावणी तांदळे, शिक्षणप्रेमी श्री हरिश्चंद्र पिंपरे, अंगणवाडी सेविका सौ.स्वानंदी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय प्रयोगभूमी-कोळकेवाडी येथील मुख्याध्यापक श्री मंगेश मोहिते, उपशिक्षिका सौ.रेखा मोहिते तसेच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे