लोटे :- खेड तालुक्यातील लोटे येथे मुंबई गोवा महामार्गावर एक्सल फाट्याजवळ एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वर भराव टाकून त्यावर चक्क शौचालय बांधण्याचा संतापजनक प्रकार घडला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत खेड तालुका भाजपा अध्यक्ष विनोद चाळके यांनी भाजपा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना लोटे व घाणेखुंट मधील ग्रामस्थांनी याबाबत कल्पना दिली असून यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आहे असे सांगितले आहे. मात्र तरीही एमआयडीसी अथवा महामार्ग प्राधिकरण यांचे कडून कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष श्री विनोद चाळके यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्र चव्हाण यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
