चिपळूण – राजकारणातून मी अजिबात निवृत्ती किंवा संन्यास घेतलेला नसून कार्यकर्ते आणि जनतेसाठी अखंडपणे राजकारणात सक्रिय राहणार आहोत. आगामी काळात लवकरच आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून विचारपूर्वक भूमिका जाहीर करणार आहोत. तोपर्यंत कोणीही विचलित न होता कायम माझ्या पाठीशी उभे राहून आजवर दिली तशीच साथ द्यावी अशी भावनिक साद चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी घातली.
दैनिक सागरच्या सागर वेव या युट्यूब चॅनेलच्या स्टुडिओत पत्रकार श्री. सुनील साळवी यांनी श्री. कदम यांची मुलाखत घेतली. त्यावेळी श्री रमेशभाईंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले की, १९७४ सालापासून मी शरद पवार साहेबांसोबत एकजुटीने काम करतोय.१९९९ साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतरही जिल्ह्यात ज्येष्ठ मंडळींसोबत पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले.मधल्या काळात पक्ष फुटला आणि दोन गट तयार झाले तरी आम्ही पवारसाहेबांची साथ सोडली नाही. साहेबांबद्दल आजही मनात प्रेमाची,आदराची आणि श्रद्धेची भावना आहे.ती सदैव कायम राहील. मात्र मधल्या काळात काही कटू अनुभव आले, त्यामुळे नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला.
जिल्हाप्रमुख पदाची नियुक्ती रोखली
माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी मुंबईत बोलविण्यात आले. मात्र अचानक निर्णय बदलून माझी नियुक्ती स्थगित करण्यात आली. वास्तविक पवारसाहेबांनी स्वतः सूचना करून मला जिल्हाध्यक्ष पद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मी मुंबईला गेलो, दुर्दैवाने राजकारण घडले. त्यामुळे मन काहीसे खट्टू झाले. पालिका निवडणुकीमुळे या विषयावर मी काही वाच्यता केली नाही. कालांतराने पालिका निवडणूक जाहीर झाली आणि लोकाग्रहास्तव मला निवडणुकीला सामोरे जावे लागले.माझ्याबरोबर पक्षाचे काही उमेदवार उभे राहिले. त्यावेळी सुद्धा पक्षाकडून एबी फॉर्म देताना असाच विचित्र अनुभव आला. ज्या कार्यकर्त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही आणि तो कधीही कोणत्या कार्यक्रमात सहभागी होत नाही अशा व्यक्तीला मुंबईतून आम्हाला न विचारता एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि त्याचा फटका निवडणुकीत आपल्याला बसला असा गौप्यस्फोट रमेशभाई कदम यांनी मुलाखतीत केला. श्री कादीर मुकादम यांना उमेदवारी देण्याऐवजी पार्लमेंटरी बोर्डाने शिफारस न केलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. असा आवर्जून उल्लेख त्यांनी मुलाखतीत केला.या सर्व गोष्टी माझ्यासाठी अपमानास्पद होत्या असा उल्लेख त्यांनी केला.
कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये*
मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नसून घेणारही नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये. आजवर जशी साथ दिली तशीच पुढेही साथ द्यावी. लवकरच आपण राजकीय भूमिका जाहीर करू अशी घोषणा त्यांनी केली.
