मुगीज : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या व कोकण कृषी विद्यापीठ वाहनचालक संघटना, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे )कार्यक्रमांतर्गत बीजांकुर ग्रुप, मुगीज यांच्या सहकार्याने मुगीज येथील सभागृहात वेंगुर्ला-४ काजू कलम व श्रीवर्धनी सुपारी रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास विस्तार शिक्षण विभागाचे विभागप्रमुख डॉ. संतोष वारवडेकर, रावे केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, तसेच वाहनचालक संघटनेचे खजिनदार श्री.बाळकृष्ण ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय श्री. अरविंद पोसकर व श्री. सर्वेश मोहिते यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागताने झाली. यानंतर डॉ. प्रवीण झगडे यांनी वेंगुर्ला-४ काजू कलम व श्रीवर्धनी सुपारी जातीची वैशिष्ट्ये, लागवडीची योग्य पद्धत, खड्ड्यांची तयारी, अंतर, सिंचन व लागवडीनंतरची निगा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर डॉ. विजय देसाई, डॉ. नरेंद्र प्रसादे व डॉ. संतोष वारवडेकर यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि फळबाग विकासाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याविषयी मार्गदर्शन केले. रावे कार्यक्रमांतर्गत कार्यरत बीजांकुर ग्रुप, मुगीजच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजन, नोंदणी, रोपवाटप व शेतकरी मार्गदर्शनामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या कार्यक्रमात मुगीज गावातील ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक वेंगुर्ला-४ काजू कलम व एक श्रीवर्धनी सुपारीचे रोप मोफत वितरित करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आयोजकांच्या या प्रयत्नाचे उपस्थितांनी कौतुक केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष श्री राकेश विचारे, उपाध्यक्ष श्री मिलिंद बालगुडे आणि सर्व सदस्य तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, दृकश्राव्य चालक श्री श्रीयश पवार आणि रावेच्या बीजांकुर गटाच्या सर्व विद्यार्थिनी यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.
मुगीज येथे काजू व सुपारी रोपांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
