खेड (प्रतिनिधी) : – संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे सावट गडद होत असताना आता कोकणातही त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी स्थानिक रिक्षाचालक, स्कूल बस चालक तसेच सीएनजीवर चालणाऱ्या भाडेकरू वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांना तब्बल तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र असून त्यामुळे चालकांचा वेळ व उत्पन्न दोन्हीवर परिणाम होत आहे. “रोजचा धंदा बंद पडत चालला आहे, पोट भरायचं कसं?” असा सवाल स्थानिक चालकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिक वाहन चालकांच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याची भावना विविध चालक संघटनांनी व्यक्त केली आहे.
या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी १८ मे रोजी विविध वाहन चालक संघटना एकत्र येत खेड शहरातील तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच खेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. सीएनजीचा पुरवठा सुरळीत करावा, स्थानिक वाहन चालकांना प्राधान्य द्यावे तसेच सीएनजी पंपांवरील नियोजन सुधारून तातडीने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, इंधन तुटवड्यामुळे कोकणातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.