चिपळूण : खेंड येथील रहिवासी विशाल जानवलकर यांच्या घराशेजारी मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 2.10 ते 2.15 वाजण्याच्या दरम्यान भला मोठा अजगर आढळून आला. अचानक अजगर दिसल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वन विभागासाठी सर्पमित्र म्हणून कार्यरत असलेले शिवराज शिर्के (उर्फ बाळा) यांना संपर्क करण्यात आला. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक खबरदारी घेत त्यांनी अजगराला सुरक्षितरीत्या पकडून त्याची सुटका केली. त्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

याबाबत विशाल जानवलकर यांनी सर्पमित्र शिवराज शिर्के यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, वन्यजीवांचे संरक्षण करताना नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

“माहिती मिळताच त्वरित मदतीला धावून येऊन अजगर सुरक्षित पकडल्याबद्दल मी शिवराज शिर्के (बाळा) यांचा खूप खूप आभारी आहे,” असे विशाल जानवलकर यांनी सांगितले.