चिपळूण : श्री क्षेत्र टेरव राधाकृष्णवाडी येथील स्वयंभू जागृत, पुरातन, निसर्गसंपन्न व सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोमवार दिनांक १५ जून रोजी मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्त अभिषेक, होम हवन, श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, श्री राधाकृष्ण भजन मंडळाचे सुस्वर संगीत भजन, हरिपाठ, कीर्तन व रात्री महाप्रसाद अश्या विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हिरव्यागार निसर्गसंपन्न परिसरात वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन २००२ साली यापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला होता. नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करुन सोमवार दिनांक १५ जून रोजी सदर मंदिराचे उद्घाटन सर्वश्री प्रतापराव शिंदे, अध्यक्ष रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, सूर्यकांत खेतले, सभापती पंचायत समिती चिपळूण, सौ. पूजाताई निकम, जिल्हा परिषद सदस्या, रत्नागिरी यांच्या व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. श्री खेर्डोबेश्वर मंदिरात स्वयंभू शंकराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळं वेगळं समाधानही लाभते म्हणूनच श्रावण महिन्यात सदर मंदिरात अभिषेक करण्यासाठी गर्दी होत असते. श्री क्षेत्र टेरव गावातील खेर्डोबा, धोकटोबा व म्हसोबा ह्या पुरातन ठिकाणी देवदेवतांचा वावर आहे असे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आजही सांगत असतात.
