रोहा : पुणे येथे ५ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ८व्या डब्ल्यूजीकेएफ जागतिक गोजू रियू कराटे अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील रोहा-अष्टमी येथील नाडकर भगिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. फातिमा मन्सूर नाडकर आणि सारा मन्सूर नाडकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पदके पटकावून रोहे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
फातिमा मन्सूर नाडकर हिने १८ ते २० वर्षे वयोगटात, तर सारा मन्सूर नाडकर हिने १६ ते १७ वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळवले. दोन्ही भगिनींनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
फातिमा ही एम.बी.मोरे कॉलेजमध्ये सिनियर पहिल्या वर्षात (वाणिज्य शाखेत ) शिक्षण घेत असून सारा ही रेवा स्कूलमध्ये ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे.शिक्षणा सोबतच कराटे या क्रीडा प्रकारात त्यांनी केलेली ही उल्लेखनीय कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
दोन्ही भगिनींच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या या यशाबद्दल वडील मन्सूर नाडकर आणि प्रशिक्षक निलेश मनोहर सर यांचेही विशेष कौतुक होत आहे.
या दुहेरी यशामुळे नाडकर कुटुंबीयांसह अष्टमी आणि रोहा परिसरात आनंदाचे वातावरण असून दोन्ही भगिनींचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशाने भारतीय तिरंग्याचा मान उंचावला असून भविष्यातही त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठी कामगिरी करावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
