खेड : लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील उर्मि केमिकल कंपनीमध्ये पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी खेड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा सुनिल जाधव यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी खेड तहसीलदारांना लेखी निवेदन सादर केले आहे.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, उर्मि केमिकल कंपनीच्या व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी केले. आपल्याला कामावरून कमी करण्याचे कारण लेखी स्वरूपात देण्यात यावे किंवा पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कामावरून कमी केल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा कुटुंबावर आर्थिक परिणाम होत असल्याचे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी रोजगाराची आवश्यकता असल्याने कंपनी व्यवस्थापनाने आपल्याला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, निवेदनात जाधव यांनी लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी वाशिष्ठी-जगबुडी नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले असून, या परिस्थितीमुळे आपल्या कुटुंबासमोरही आर्थिक संकट निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
“मला कामावरून का कमी करण्यात आले, याची लेखी कारणमीमांसा करावी अथवा मला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे. अन्यथा नाईलाजास्तव २ ऑक्टोबरपासून खेड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार,” असा इशारा सुनिल जाधव यांनी कंपनी व्यवस्थापन तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
उपोषणाच्या कालावधीत आपल्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास त्यास उर्मि केमिकल कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार राहील, असेही जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यांच्या मागणीवर कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.