मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे आणि निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर केली आहे. राजकीय पक्ष आणि नागरिकांनाही या प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एसआयआरच्या नावाखाली आंदोलन करण्याला कोणतेही घटनात्मक अधिष्ठान नाही. आंदोलनजीवी सीजेपीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, सह माध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
एसआयआर प्रक्रियेबाबत बोलताना ॲड. शेलार म्हणाले, निवडणूक आयोगाने संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याची कार्यपद्धतीही स्पष्ट केली आहे. सर्व राजकीय पक्षांना या प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अर्ज, दावे-हरकती, सुनावणी तसेच आवश्यक कागदपत्रांबाबतची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. आयोगाने प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांनाही या प्रक्रियेची माहिती दिली असतानाही काही राजकीय पक्ष आणि संघटना आंदोलनाची भूमिका का घेत आहेत, हा प्रश्न आहे.
एखाद्या प्रक्रियेबाबत आक्षेप असेल तर तो घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने मांडता येतो. निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची संधी आहे. न्यायालयीन मार्गही उपलब्ध आहे. मात्र या सर्व प्रक्रिया उपलब्ध असताना आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे?, असा सवाल ॲड. शेलार यांनी उपस्थित केला.
एसआयआरच्या माध्यमातून कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी आवश्यक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. ज्यांच्या नावाबाबत काही आक्षेप असतील, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी आहे. त्यामुळे लाखो प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असेही ॲड. शेलार म्हणाले.
काँग्रेससह काही राजकीय पक्ष सातत्याने भाजपा आणि सरकारवर या विषयावर आरोप करत आहेत. मात्र निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था असून, तिच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करताना उपलब्ध असलेल्या संस्थात्मक मार्गांचा वापर करणे अपेक्षित आहे, असे ॲड. शेलार यांनी नमूद केले.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील आपल्या भाषणात घटनात्मक मार्गांचे महत्त्व अधोरेखित केले होते. घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना असंवैधानिक मार्गांचा अवलंब करणे म्हणजे अराजकतेचे व्याकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आजच्या परिस्थितीत बाबासाहेबांच्या या विचारांची आठवण होते, असेही ॲड. शेलार यांनी सांगितले.
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून घटनात्मक संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करणे योग्य नाही. एसआयआर प्रक्रियेबाबत काही आक्षेप असतील तर ते निश्चितच मांडावेत; पण त्यासाठी उपलब्ध असलेल्या घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहन ॲड. शेलार यांनी केले.
भारताच्या निवडणूक प्रक्रियेची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रशंसा केली आहे. 22 देशांच्या प्रतिनिधींनीही याबाबत भारताचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जेव्हा भारताची निवडणूक पद्धत आणि सरकारचे कौतुक होते तेव्हा तेव्हा विरोधक त्याविरोधात आंदोलन करून देशाची बदनामी करतात, असा आरोप ॲड. शेलार यांनी केला.
जिथे विरोधक जिंकतात तिथे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही. भाजपा जिंकली की मात्र यांचा पोटशूळ उठतो. स्वत:चा अजेंडा राबवण्यासाठी राजकीय कुहेतुने उभ्या केलेल्या आंदोलनाचा प्रकार शिवाजी पार्कवर करू पाहताहेत तो असंविधानिक आहे. आंदोलनजीवी सीजेपीच्या माध्यमातून जनतेला कदापि न्याय मिळणार नाही, असे ॲड. शेलार यांनी सुनावले.