मुंबई : आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले की उबाठातून हकालपट्टी होणार असल्याने संजय राऊत, तुम्ही आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगालची चिंता करण्यापेक्षा आपल्या राजकीय भवितव्याबद्दल चिंता करा. तुम्ही मात्र काँग्रेसची चिंता करायला लागलात.

आसाममध्ये काँग्रेसचे काय होईल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे काय होईल, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचे काय होईल याची तुम्हाला चिंता आहे. परंतु आपल्या उबाठा गटाची महाराष्ट्रात काय अवस्था झाली आहे याची चिंता तुम्हाला नाही. आपल्या पक्षातील स्वतःचे स्थान कसे शाबूत राहील याची चिंता करा. देशाची चिंता करण्यासाठी इथली 140 कोटी जनता आणि त्यांचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत, असे टीकास्त्र भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय होत असल्याचे दिसू लागल्याने संजय राऊतांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

ज्या पद्धतीने आझाद मैदानावर मोर्चा काढत तेथील अमर जवान ज्योतीला लाथा घातल्या गेल्या होत्या तेव्हा संजय राऊत, तुम्ही गप्प का होता? तुम्हाला देशविरोधी लोकांचे मोर्चे प्रिय आहेत आणि महिलांनी मोर्चा काढला की तुमच्या पोटात दुखू लागते. रझा अकादमीच्या मोर्चाचा तुम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो. मात्र नारी शक्ती आता जागृत झालेली आहे. या नारी शक्तीच्या ठिणगीमुळे संजय राऊत तुमचा पक्ष भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही, असे श्री. बन यांनी ठणकावून सांगितले.