मुंबई : लोकांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता… आणि प्रशासनावर असलेली बारीक नजर याचे प्रत्यंतर देणारी कृती रविवारी बारामतीकरांना अनुभवायला मिळाली. साक्षात अजितदादाच बारामतीकरांच्या सेवेत रुजू झाल्याची झलक सुनेत्रा अजित पवार यांच्या कार्यशैलीतून पहायला मिळाली.

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी काल (रविवार) बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा… स्वच्छतेची स्थिती… औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती घेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचना सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेशही दिले. ही केवळ औपचारिक भेट नव्हती, तर अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम सुनेत्रावहिनी करत असल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा दिसून आले.

जनतेच्या प्रश्नांबाबतची तत्परता… कामातील शिस्त… आणि प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याची पद्धत यामुळे आज अनेकांना त्यांच्यामध्ये अजितदादांचे प्रतिबिंब दिसत आहेत.